मराठी बृहद्कोश

नसती (?) उचापत

Submitted by आदूबाळ on Tue, 04/28/2020 - 10:38

एखाद्या शब्दाचा कोशातला आणि व्यवहारातला अर्थ वेगवेगळा असण्याची उदाहरणं कधीकधी बघायला मिळतात. अशा वेळी उत्स्फूर्तपणे येणारी प्रतिक्रिया म्हणजे, “ह्या:! काय फालतू कोश आहे! अर्थ चुकवून ठेवला आहे!” पण याबरोबरच एका आणखी शक्यता विचारात घ्यायला हवी, आणि ती म्हणजे काळाबरोबर शब्दाचा अर्थ बदलल्याची.

‘उचापत’ हा असाच एक शब्द आहे. हल्लीच्या वापरात 'उचापत'चा उपयोग बऱ्याचदा 'नसती' हे विशेषण लावून होतो. 'एखादी गोष्ट करायची गरज नसताना ती करणे किंवा करावी लागणे' असा त्याचा अर्थ लावला जातो. "कोणी सांगितली आहे ही नसती उचापत?" किंवा "अमुकतमुक काम होण्यासाठी खूप उचापती करायला लागल्या!" असं ऐकू येतं.

पण कोश उघडून 'उचापत'चा अर्थ बघितला तर काहीतरी भलतंच दिसतं.

मोल्स्वर्थ 'उचापत'चा अर्थ Taking (of goods) upon tick or credit असा देतो. आता 'Taking (of goods) upon tick' हाही सध्याच्या इंग्रजीतून हद्दपार झालेला वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ Taking (of goods) upon credit असाच होतो. म्हणजे थोडक्यात : उधारीवर माल घेणे. 'उचापतीचा रोजगार / धंदा / व्यवहार / व्यवसाय' याचा विरुद्धार्थ 'रोकडीचा रोजगार / धंदा / व्यवहार / व्यवसाय' असा दिला आहे.

'उचापत' हा शब्द माल उधारीवर घेण्याच्या कृतीबरोबरच उधारीवर घेतलेल्या मालासाठीही वापरला जातो. मोल्सवर्थ "उचापतीचें पोतें सवा हात रितें" अशी एक म्हणही देतो.

म्हणजे : मोल्स्वर्थने कोश प्रकाशित केल्याच्या वर्षी - १८५७ साली - 'उचापत' या शब्दाला नकारात्मक अर्थ नव्हता. (कदाचित मोल्स्वर्थच्या ऐकण्यात नकारात्मक अर्थ आला नसेल, अशीही शक्यता आहे.) सरळसोट व्यावसायिक पद्धत वर्णन करणारा अर्थ होता. हाच अर्थ १९११ पर्यंत कायम राहिला, कारण वझे शब्दकोशातही नेमका, आणि फक्त, व्यावसायिक अर्थच दिला आहे.

आता 'उचापत'ला नकारात्मक भाव कधी मिळाला, आणि आज वापरतो त्या अर्थापर्यंत पोचला याचा तपशील माझ्याकडे नाही. अधिक माहिती मिळाली तर / मिळाली की इथेच लिहेन.

पण मोल्सवर्थने प्रथम कोशात लिहिलेला अर्थच कायम होता का? की तोही बदलला आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकाच्या एका जुन्या अंकापर्यंत जावं लागेल.

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सन १९७३च्या अंकात डॉ० अ० रा० कुलकर्णी यांचा 'उचापत' याचा शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात ते लिहितात, '[उचापत या शब्दाचा] व्यावहारिक अर्थ आणि कागदपत्रांतला अर्थ यांत महदंतर आहे. हिशेबाच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ उधारीने गावच्या खर्चासाठी आणलेल्या वस्तू अथवा काढलेली कर्जाऊ रक्कम असा होतो. गावकऱ्यांना काही खर्च गावच्या प्रतिष्ठेसाठी अनपेक्षितपणे करावे लागत. तेव्हा प्रथम खर्च करून नंतर सरकारी मंजुरी मिळवली जाई. तेव्हा अशा अनपेक्षित घडलेल्या खर्चाचा तपशील असलेल्या कागदास 'उचापत' असे म्हणतात.'

म्हणजे इथेही 'उधार घेणे' हा अर्थ आहेच, पण आणखी एक अर्थच्छटा मिसळली आहे, ती म्हणजे 'बजेट-बाह्य, अनपेक्षितपणे करावे लागणारे - अॅड हॉक - खर्च, आणि त्या खर्चायला नंतर मिळवलेली मंजुरी'. बजेटबाहेरच्या खर्चांना मंजुरी मिळणं किती कटकटीचं असतं याचा अनुभव वाचकांपैकी अनेकांना असेल, त्यामुळे त्याला 'उचापत' हा शब्द - आधुनिक अर्थानेही - सार्थच म्हणायला पाहिजे!

शब्दांना एकापेक्षा अधिक पर्यायी अर्थही असू शकतात. त्यामुळे, 'उचापत'चे तिन्ही अर्थ (ऐतिहासिक, व्यावसायिक, आणि आधुनिक) कोशात येणं योग्य. दाते-कर्वे कोशात व्यावसायिक (उधार) आणि आधुनिक (उठाठेव, नसती उलाढाल) हे अर्थ दिले आहेत, पण ऐतिहासिक अर्थ दिलेला नाही. नवे शब्द, नवे अर्थ समाविष्ट करणं हेदेखील 'बृहद्कोश' प्रकल्पाचं ध्येय आहे. तांत्रिक बाबींवर काम चालू आहे. ते झालं की 'उचापत'चा अर्थ, डॉ० अ० रा० कुलकर्णींच्या नामोल्लेखासह बृहद्कोशात जोडू.

शेवटी, मराठी भाषेतून दिसणाऱ्या मराठी समाजाच्या आर्थिक धारणांवर लिहिल्यावाचून राहवत नाही. 'उधार घेण्या'सारख्या अत्यंत सामान्य व्यावसायिक गोष्टीला असलेला शब्द; आणि उठाठेव, नसती उलाढाल, भानगड यासाठीचा शब्द एकाच असावा याचा अर्थ मराठी मनांत उधारी घेणे, कर्ज घेणे म्हणजे 'नाही ती भानगड' करणे अशी धारणा आहे हे स्पष्ट दिसतं आहे. मोल्सवर्थने दिलेली म्हण "उचापतीचें पोतें सवा हात रितें" यातही थोडा खवचट नकारार्थी भाव आहेच, की बाबा, उधारीवर माल घेतलास तर मापात मारलं जाणं अपरिहार्य आहे! मराठी भाषेतून दिसणाऱ्या आर्थिक धारणांविषयी वेळोवेळी लिहीत जाईन, पण सध्या इतकंच पुरे!

तळटिपा :

  1. काही विशेषण-नामांच्या किंवा क्रियाविशेषण-क्रियापदांच्या जोड्या शंकर-जयकिशनच्या जोडीसारख्या अभंग असतात. त्याबद्दल ब्लॉगपोस्ट परत कधीतरी! 

  2. अधिक माहितीसाठी इथे पहा : https://idioms.thefreedictionary.com/buying+on+tick  

  3. भा० इ० सं० मं० त्रैमासिक, वर्ष ५२, अंक १-४, पान ६१-७०